

महादेवराव महाडिक जिल्ह्याच्या राजकारणातील अजब रसायन. राजकारणातला हुकमी एक्का, ही भावना त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांत आहे. सुदृढ आरोग्याचा मंत्र त्यांनी आजही जपलाय. पहाटे चार वाजता उठून जोर बैठकांचा व्यायाम त्यांचा चुकत नाही. दिवसातून एक वेळेस जेवणारा हा राजकीय नेता. पुलाच्या शिरोलीतून राजकारणाची सूत्रे त्यांनी हलवली. किंबहुना आजही तेथूनच राजकारणाचे ते आडाखे बांधतात. अठरा वर्षे विधानपरिषदेवर ते आमदार राहिले. ताराराणी आघाडीच्या स्थापनेतून महापालिकेतील राजकारण ढवळून काढले. जिल्ह्यात त्यांच्या "फॅन क्लब'ला तोटा नाही. जिल्ह्यात ते कोठेही प्रवास करोत, त्यांची 7474 गाडीची लोकांत क्रेझ आहे. केवळ गाडीच्या नंबरवरून "अप्पा' महादेवराव महाडिक भागात आल्याची वर्दी लोकांना आपोआप मिळते.
चेहऱ्यावर तेज, दमदार आवाज, अंगावर सफारी हा अप्पांचा खास लूक. बोलण्या-चालण्यात मोकळाढाकळा तसाच मुत्सद्दी राजकारणी माणूस. अप्पांच्या राजकारणाची कक्षा रुंदावली, तसा उद्योग-व्यवसायही. त्यांच्या घरात 1984 ला होंडा गाडी आली. गाडीच्या नंबरप्लेटवर 7474 हा नंबर झळकला. त्यानंतरच्या काळात अप्पांच्या प्रगतीचे घोडे वेगाने दौडू लागले. महापालिकेच्या राजकारणाची सूत्रे त्यांच्याकडे आली. ताराराणी आघाडीच्या स्थापनेतून महापालिकेचे राजकारण बदलले. नगरसेवकांचा गट त्यांच्या नेतृत्वाखाली आकाराला आला. सुमारे पंधरा वर्षे आघाडीने महापालिकेत वर्चस्व गाजवले. महापालिकेतल्या सत्तेच्या सारीपाटावर ते समाधान मानणारे नव्हते. विधान परिषदेवर आमदार म्हणून त्यांची वर्णी लागली. सलग अठरा वर्षे ते आमदार राहिले. गोकुळ, जिल्हा मध्यवर्ती बॅंक, बाजार समितीच्या राजकारणात त्यांचा शिरकाव झाला. या यशाला 7474 क्रमांक महत्त्वपूर्ण ठरल्याची भावना महाडिक कुटुंबीयांत निर्माण झाली. घरात येणाऱ्या नव्या गाड्यांवर तो कोरला गेला.
अप्पांच्या दिनक्रमाचे टाइमटेबल बदलत नाही. व्यायामानंतर नाश्ता, राजाराम कारखाना, शाहूपुरीतील कार्यालय, बेडकिहाळच्या कारखान्याला भेट देण्याचा त्यांचा क्रम चुकत नाही. त्यांच्या जाण्याचा मार्ग फिक्स आहे. ते वेळेचे पक्के असल्याने त्यांच्या गाडीच्या क्रमांकावरून घड्याळाचे काटे कोणत्या अंकांवर आहेत, हे लोकांना ठाऊक झाले आहे. मुलगा अमल व स्वरूप यांचा अप्पांच्या वाटेवरचा प्रवास आहे. राजकारणातील यशस्वीतेचा मंत्र त्यांना अप्पांकडून मिळालाय. कोल्हापूर दक्षिणचे आमदार म्हणून अमल महाडिक यांनी प्रतिनिधित्व केलंय. शौमिका महाडिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राहिल्या आहेत. विशेष म्हणजे 7474 हा नंबर त्यांच्यासाठीही विशेष ठरलाय.
हे पण वाचा - मोठी बातमी - कोल्हापुरात आता होणार मोफत स्वॅब तपासणी
महाडिक कुटुंबीयांत मर्सिडीज, जग्वार, व्होल्वो गाड्या आहेत. वयाच्या 79 व्या वयातही अप्पा स्वतःच ड्रायव्हिंग करतात. विधानपरिषदेच्या अधिवेशनासाठी ते गाडीने एकटेच गेल्याचा इतिहास आहे. या वयातही त्यांच्या डोळ्यावर चष्मा नाही, हेच विशेष. स्वरूप महाडिक म्हणाले, "हा नंबर आमच्यासाठी भाग्याचा ठरला आहे. प्रत्येक गाडीसाठी आम्ही त्याचाच हट्ट धरतो.''
संपादन - धनाजी सुर्वे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.